पुणे – स्वराज्याची प्रथम राजधानी असलेल्या राज्य संरक्षित स्मारक किल्ले राजगड परिसरात रात्रीच्या वेळी मुक्काम करण्यास बंदी घालण्याचा आदेश पुण्याचे पुरातत्व विभाग सहायक संचालक विलास वाहणे यांनी काढला. या संदर्भातली प्रत पुरातत्व विभाग संचालक मुंबई, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी वेल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वेल्हे, ग्रामपंचायत गुंजवणे, ग्रामपंचायत पाल बुद्रुक वेल्हे यांना पाठवली आहे.
राजगडावरील पराक्रमाची माहिती दिवसेंदिवस लोकांसमोर येत असताना पर्यटक राजगडाच्या ओढीने किल्ला पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी येत आहेत. या निर्णयामुळे राजगडावरून सर्योदय, सूर्यास्त कधीही पाहता येणार नसल्याने पर्यटकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे.
या प्रकारचे निर्णय घेणे हास्यस्पद असून या निर्णयाचा स्थानिकांसह पर्यटकांनी निषेध केला आहे. यांदर्भातील अनेक पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या असून गडप्रेमी आणि ट्रेकर्स यांनी या निर्णयाचा कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे.
‘ज्या खात्याला गडाची एवढी काळजी आहे त्यांनी आपली मागील कामे कशी केली आहेत, याची एकदा शहानिशा करावी. आपल्या मागील कित्येक चुका अगोदर या खात्याने पहाव्यात. नको ती हिटलरशाही लादू नका. गड मुक्कामास बंद करून, अशी कोणती कामे यांना गडावर करायची आहेत?’ असा सवाल सोशल मीडियावर शिवप्रेमी विचारात आहेत.
तसेच, ‘राजगड तुमच्या बापाचा आहे का? राजगड आमच्या बापाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे…’ या आशयाचे पोस्टर देखील आता सोशलवर व्हायरल होऊ लागले आहेत.