प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -राज्यातील शालेय शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तीक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व आवश्यकता भासेल, त्यावेळी तत्काळ कागदपत्रे उपलब्ध व्हावीत, यासाठी डिजिलॉकर या ऍपचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार आहे. डिजिलॉकरमध्ये अपलोड केलेली कागदपत्रे डिजिटल स्वरुपात असल्याने ती नेहमी सोबत बाळगता येणार आहेत.
केंद्र शासनाने डिजिलॉकर हे ऍप तयार केले आहे. यामध्ये कागदपत्रे डाऊनलोड करुन सेव्ह करण्याची तरतूद आहे. या ऍपमध्ये एक जीबी क्षमतेपर्यंत डाटा स्टोअर करता येणार आहे. डाऊनलोड केलेली कागदपत्रे ही मूळ कागदपत्रासमान असणार आहेत.
त्यामुळे या प्रमाणपत्रांची मूळ प्रत सोबत बाळगण्याची देखील आवश्यकता भासणार नाही. डाऊनलोड केलेली कागदपत्रे केंद्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान कायदा 2000 मधील तरतुदीनुसार मूळ कागदपत्रांचा दर्जा प्राप्त असणार आहे. पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, कोविड लस प्रमाणपत्र व विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे या ऍपवर डाऊनलोड करता येणार आहेत.
याशिवाय आपणास आवश्यक असणारी विविध प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्र, वेतन प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे आदी अन्य कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये विविध फोल्डरमध्ये अपलोड करण्याची सुविधा आहे.
डिजिलॉकर ऍप हे पूर्णपणे मोफत असून, दैनंदिन वापरात महत्वाची भूमिका निभावणार आहे. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियमित वापरातील मोबाइलमध्ये डिजिलॉकर ऍप इन्स्टॉल करुन वापराबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त