भोपाळ – वैद्यकीय सेवा करताना आम्हाला किंवा आमच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली तर आम्हाला मोफत उपचार द्यावेत, या मागणीसाठी मध्य प्रदेशातील तीन हजार कनिष्ठ डॉक्टर्स सोमवारपासून संपावर गेले आहेत.
या संपात तीन हजार डॉक्टर्स सहभागी झाले असल्याची महिती त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अरविंद मीना यांनी सांगितली. आमच्या मागणीविषयी आज संध्याकाळपर्यंत सरकारने निवेदन जारी केले नाही, तर आम्ही 1 जूनपासून बेमुदत संप सुरू करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावताना आमच्यापैकी काहींना करोनाची लागण झाली तर आमच्यावरील उपचारासाठी स्वतंत्र बेड्स आरक्षित ठेवावेत, विद्यावेतनात वाढ करावी, करोना उपचार मोफत करावेत ही त्यांची मुख्य मागणी आहे.
हे तीन हजार ज्युनिअर डॉक्टर्स सहा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न आहेत. 24 दिवसांपूर्वी सरकारने या मागण्या मान्य केल्या आहेत; पण अजून त्यावर निर्णय झालेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.