… तर भारताशी चर्चेची पाकिस्तनची तयारी : इम्रान खान

इस्लामाबाद  – जर भारताने जम्मू काश्‍मीरला 5 ऑगस्ट 2019 पूर्वीचा दर्जा पुन्हा बहाल केला तर भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. कलम 370 नुसार देण्यात आलेला जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द केला आहे.

त्यानंतर जम्मू काश्‍मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या कृतीवर पाकिस्तानने नेहमीच कडवट टीका केली आहे.

जम्मू काश्‍मीरला पूर्वीचा दर्जा पुन्हा बहाल न करताच पाकिस्तानने भारताशी चर्चा सुरू केली, तर ते काश्‍मिरींकडे पाठ फिरवण्यासारखे होईल, असे खान म्हणाले. नागरिकांबरोबरच्या लाइव्ह वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताने 5 ऑगस्ट रोजी उचललेली पावले मागे घेतल्यास आम्ही नक्कीच चर्चा करू असेही खान म्हणाले.

जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि स्वतःचे प्रश्न सोडविण्यास भारत सक्षम आहे, असे भारताच्यावतीने वारंवार सांगितले जात आहे. दहशतवाद, शत्रुत्व व हिंसाचारमुक्त वातावरणात पाकिस्तानशी सामान्य मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची आपल्याला इच्छा असल्याचे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.

पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 2016 मध्ये केलेल्या हल्ल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. यानंतर उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामुळे हे संबंध अधिकच बिघडले आहेत.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावरील हल्ल्यात 40 जवान शहिद झाले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून भारताच्या लढाऊ विमानांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या हद्दीतील जैश ए मोहंम्मदचे प्रशिक्षण तळ उद्‌ध्वस्त केले होते. तेंव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले.

तथापि, अलीकडे नियंत्रण रेषेवरील शांतता पूर्ववत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारीमध्ये सहमती दर्शविली. तेव्हापासून द्विपक्षीय संबंधात काही सुधारणा झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.