रेडा – इंदापूरमधील करोनाचा आलेख दिवसोंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी (दि. 17 ) 52 वर्षीय व 35 वर्षीय अशा दोन महिलांचा एकाच दिवशी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
इंदापूर शहरानजीक असणाऱ्या एका वस्तीमध्ये 52 वर्षीय महिला राहत असून, 35 वर्षीय महिलाही याच परिसरातील आहे. 52 वर्षीय महिला (दि. 1) जून रोजी पुण्यातील कोंढवा परिसरात लग्न समारंभासाठी गेली होती. माघारी परतल्यानंतर शनिवारी (दि. 13) या महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार केल्यानंतर दोन दिवसांनी दुसऱ्या एका खासगी डॉक्टरकडे ही महिला उपचारासाठी गेली. दुसऱ्या व त्या डॉक्टरने तिसऱ्या डॉक्टरकडे या महिलेला उपचारासाठी पाठवले. मात्र तिसऱ्या डॉक्टरने वेळीच प्रसंगावधान राखून या महिलेला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
सोमवारी (दि. 15) या महिलेला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले. मात्र तिची प्रकृती खालावत असल्याने तिला पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्या रुग्णालयाने त्यांचे घशाचे नमुने तपासणीला पाठवले असता महिलेचा अहवाल बुधवारी (दि. 17) पॉझिटिव्ह आला.
दोन्ही महिलांच्या संपर्कात आलेल्या एकूण 19 संशयितांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असून, त्यांचा अहवाल गुरूवारी (दि. 18) येतील असेही तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.