मंचर येथे पोलीस निरीक्षक खराडे यांचे आवाहन
मंचर- शाळेत जाताना किंवा घरी येताना विद्यार्थीनींना रोडरोमिओ त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त पोलीस करतील. रोडरोमिओंचा त्रास विद्यार्थीनींनी सहन करू नये, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे महात्मा गांधी विद्यालयात महिला व मुलींच्या सुरक्षा अनुषंगाने तसेच हैदराबाद येथील महिला अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसोबत या घटनेच्या अनुषंगाने घटना घडू नयेत म्हणून घ्यायची दक्षता व खबरदारी याबाबत मार्गदर्शन करताना खराडे बोलत होते. यावेळी उपमुख्याध्यापक माधव कानडे, पर्यवेक्षक साहेबराव काळे, यादव चासकर, गुप्त वार्ता पोलीस विभागाचे प्रमुख विनोद गायकवाड, रमेश करंडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समाजातील गुन्हेगारी घटनेबाबत गांभीर्याने पाहिले पाहिजे. विद्यार्थीनींनी आपल्या आई-वडिलांशी संवाद साधला पाहिजे.
आपल्या नातेवाईकांबाबतही जागृत राहिले पाहिजे. कायद्याविषयक माहीती तसेच विद्यार्थीनींना काही त्रास होत असल्यास तात्काळ मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कर्मवीर प्रबोधिनी अंतर्गत साधना विद्यालय हडपसर येथे झालेल्या गायन स्पर्धेत विद्यालयातील स्तवन तनपुरेने द्वितीय क्रमांक पटकवल्याने खराडे यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती उपार, किशोर जगताप, दत्तात्रय चासकर, दिलीप चौधरी उपस्थित होते.