साधारण दोन वर्षांपूर्वी कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला. सुरुवातीपासूनच हा शो आणि कपिल या दोन्हींबाबत अनेक वादविवाद घडत गेले. वास्तविक, फॅमिली एंटरटेन्मेंट म्हणून बनवण्यात आलेला हा निखळ आणि धमाल विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना मनापासून आवडत आला आहे. पण तरीही या शोमागचे वादाचे ग्रहण काही केल्या संपलेले नाही.
आता या शोमध्ये परीक्षक असलेल्या अर्चना पुरणसिंह यांच्या शरीराविषयी आणि त्यांच्याविषयी चेष्टा केल्याबद्दल प्रेक्षकांनी आणि काही लोकांनी या शोला विरोध दर्शवला आहे. वास्तविक पाहता अर्चनाने या सर्व टिप्पण्या आणि तिच्यावर झालेले विनोद हे खिलाडूवृत्तीने स्वीकारलेले दिसले होते. पण तरीही प्रेक्षकांना ते रुचलेले दिसत नाही.
या विरोधाचा सूर इतका वाढत गेला की शेवटी निर्मात्यांना अर्चनावर कोणतेही विनोद केले जाऊ नयेत किंवा त्यांचे प्रमाण कमी असावेत असेकपिलसह त्याच्या टीमला सांगावे लागले. या शोमध्ये पूर्वी नवज्योतसिंग सिद्धी परीक्षक म्हणून झळकायचे. पण त्यांच्या जागी अर्चना यांची वर्णी लागली.
खरे तर तेव्हापासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून कपिल आणि त्याच्या टीममधील सहकारी शोदरम्यान अर्चना यांच्यावर विनोद करत असतात. पण प्रेक्षकांना त्यातील अनेक विनोद रुचत नाहीयेत. काहींनी तर स्पष्टपणाने हे कारण पुढे करत हा शो पाहणे आम्ही बंद केले आहे, असे मेसेजेस सोशल मीडियावरुन कपिलला पाठवले आहेत.