कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. त्यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.
मागील काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील राज्यात लागले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पाच आमदार आणि दोन खासदार एकेकाळी या जिल्ह्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले होते. मात्र, सध्या या जिल्ह्यात केवळ दोनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रसार संपूर्ण जिल्ह्यात करणार असल्याचे देखील पाटील म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोनच आमदारावरून अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीची कॉंग्रेसची स्थापना झाली, त्यानंतर पक्षाची मोठी ताकद होती. मात्र आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न हातात घेतले पाहिजे, रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे, केवळ पोस्टर लावून, घोषणा देऊन पक्ष वाढत नसतो, अशी नाराजी पवार यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती.