पुणे : संचारबंदीच्या काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या खासगी क्लिनिक मध्ये जाणाऱ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदी मध्ये अडवून ठेवू नका. डॉक्टरांचे ओळखपत्र पहावे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून त्याची शहानिशा करून सोडावे, अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिल्या आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांपासून आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. त्यामुळे कारोना व्यतिरिक्त इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयावर ताण येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी खासगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवावेत.
तर काही डॉक्टरांनी पालिकेच्या रुग्णालयात येऊन करोना व्यतिरिक्त आजारांचे रुग्ण तपासावेत, असे आवाहन पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी केले होते. त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय ए एम) डॉक्टरांनी त्यासाठी होकार देत. दोन दिवसांपासून आपली क्लिनिक सुरू केली आहेत. तर काही पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यासाठी येत आहेत.