चेन्नई – केंद्र सरकारने विमानतळाच्या खासगीकरणाचा सपाटा चालवला असून त्याला तमिळनाडूतील द्रमुक पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. विविध राज्यांतील विमानतळांचे खासगीकरण हा राज्यांच्या स्वायत्ततेवरचाच घाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच पुन्हा तीन विमानतळ अदानी यांना दिली आहेत. हा केंद्र सरकारने घेतलेला एकतर्फी निर्णय असून तो त्वरित मागे घेण्याची गरजही द्रमुक पक्षाने व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी ट्विटरवर ही मागणी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की कोणत्याही विमानतळाच्या खासगीकरणाचा निर्णय घ्यायचा असेल तर संबंधित राज्य सरकारशी केंद्राने सल्लामसलत केली पाहिजे असा निर्णय 2003 सालीच घेण्यात आला आहे. तथापि, मोदी सरकारने हा निर्णय बासनात गुंडाळून राज्य सरकारांना विश्वासात न घेताच परस्पर हा निर्णय घेतला आहे असा आरोपही त्यांनी केला.
तिकडे केरळ सरकारनेही थिरूवनंतपुरम विमानतळाच्या खासगीकरणाला विरोध दर्शवला असून त्यांनी त्यासाठी सर्व पक्षांना एकत्र घेऊन सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने या आधीच फेब्रुवारी 2019 रोजी देशातील सहा विमानतळ अडाणी ग्रुपला 50 वर्षांच्या कराराने चालवायला दिले आहेत.