पिंपरी, दि. २ – नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत करण्यासाठी प्रशासनाने एक जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र त्या आदेशात डीजे देखील सुरु राहतील, याबाबत कुठलीही सूचना नव्हती. ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी त्यांनी मध्यरात्री बारा वाजता नियमाप्रमाणे डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहिली, पण डीजेचा आवाज मात्र बंद झाला.
करोना साथ ओसरल्यानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वचजण उत्सुक होते. प्रशासनाने देखील नागरिकांच्या आनंदाला भर टाकण्यासाठी हॉटेल एक जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, असे सांगितले. त्यामुळे अनेकांनी हॉटेलमध्ये बुकिंग केले. रात्रभर डीजेच्या तालावर झिंगून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा प्लॅन करण्यात आला. मध्यरात्री बारा वाजता आनंद शिगेवर असतानाच अचानक हॉटेलमधील डीजे बंद झाले. आत्ता कुठे नवीन वर्षाची सुरुवात झाली, अन लगेच डीजे बंद झाल्याने अनेकांचा हिरमुड झाला.
३१ डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील अडीच हजार पोलीस रस्त्यावर होते. रात्रभर नागरिक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन, पार्टी करत असताना पोलीस मात्र नागरिकांच्या आनंदाला गालबोट लागू नये यासाठी खडा पहारा देत होते. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यास भेट दिली. हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या असल्यामुळे इथल्या सेलिब्रेशनला वेगळी किनार असते. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष आयटी पार्क मधील न्यू इयर सेलिब्रेशनकडे असते.
आयुक्त चौबे यांनी मध्यरात्री बारा वाजता डीजे बंद होतील आणि हॉटेल सुरु राहतील, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. डीजे बंद होताच अनेकांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला. यामुळे मध्यरात्री आयटी पार्क परिसरात शेकडो वाहने रस्त्यावर आली. झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.