- 15 व्या वित्त आयोगाचा 23 कोटींचा पहिला हप्ता मंजूर
पिंपरी – करोना विषाणूच्या संक्रमणामुळे आर्थिक चक्रात सापडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र व राज़्य सरकारने दिलासा दिला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटात पिंपरी महापालिकेला 22 कोटी 99 लाख 32 हजार 746 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. पाणी पुरवठा व व्यवस्थापन सुधारणा आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी हे अनुदान देण्यात आले आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या सन 2020-21 वर्षाकरिता पहिला अहवाल तसेच केंद्र सरकारची स्पष्ट अधिसूचना राज्य सरकारला प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने मिलियन प्लस सिटीज गटाकरिता पाणीपुरवठा व व्यवस्थापन सुधारणा आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठीचे अनुदान पालिकेला मिळाले आहे.
राज्य सरकारला यासाठी एकूण 396 कोटी 50 लाख इतके अनुदान मिळाले आहे. हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला 22 कोटी 99 लाख 32 हजार 746 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. करोना महामारीमुळे अर्थिक संकटात असताना पंधराव्या वित्त आयोगाचा पहिला हप्ता मिळाल्याने आर्थिक चक्रात अडकलेल्या पालिकेला दिलासा मिळाला आहे.