पुणे (संजय कडू) – भारती विद्यापीठ परिसरातील एका सोनाराला ” स्पेशल 26′ चित्रपटाप्रमाणे लूटण्यात आले. संबंधीत सोनाराचे अपहरण करुन 20 लाखाची रोकड आणी 300 ग्रॅम सोने लूटण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत गुन्हेगारांची धरपकड केली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका सोनाराने फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भारती विद्यापीठ परिसरात एका सोनाराच सोन्याची नथ बनवण्याचा व्यवसाय आहे. तो घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करत होता. त्याचा व्यवसाय वाढल्याने तो परिसरातच एक दुकाने विकत घेण्याच्या विचारात होता. यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संबंधीत गुन्हेगारांना होती. त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला होता. दरम्यान सोनाराला लूटण्यासाठी एका प्लॅन आखण्यात आला. त्यानूसार आठही गुन्हेगारांनी इन्कमटॅक्स ऑफिसर बनून त्याच्या घरावर धाड टाकली.
यावेळी त्याच्या घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणार करण्यात आला. घरातील 20 लाखाची रोकड आणी 300 ग्रॅम सोने सील करुन सोबत घेण्यात आले. सराफाने पोलिसांकडे धाव घेऊ नये म्हणून त्याला अपहरण करुन सोबत घेण्यात आले. सराफाला स्वामी नारायण मंदिरापाशी गाडीतून सोडून देण्यात आले.
यानंतर सर्व ऐवज घेऊन आरोपी पळून गेले. घाबरलेल्या सराफाने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथके तयार करुन गुन्हेगारांच्या मागावर धाडली होती. रात्री उशीरा यातील काही गुन्हेगार हाती लागले. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.