पिंपरी – भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच, रुग्णालयाचे पुन्हा एकदा फायर ऑडिट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घडलेल्या घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेनंतर पुणे जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीबाबत माहिती घेतली असता नवजात शिशू अतिदक्षता कक्ष (एसएनसीयू) सुरक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. डॉ. नांदापूरकर म्हणाले, रुग्णालयामध्ये दर आठवड्याला इलेक्ट्रिक साहित्याची पाहणी केली जाते.
रुग्णालयाचे फायर ऑडिट महापालिका अग्निशामक विभागाकडून यापूर्वी करण्यात आलेले आहे. भंडारा येथे घडलेल्या गंभीर घटनेनंतर पुणे जिल्हा रुग्णालयाचे पुन्हा फायर ऑडिट करण्याचे नियोजन केले आहे. रुग्णालयात 24 खाटांचे एक युनिट (एसएससीयू) आहे, जिथे लहान बालकांवर उपचार केले जातात. त्या ठिकाणी नियमित इलेक्ट्रिशियन पाहणी करतो. तसेच, इलेक्ट्रिक विभागाचे तांत्रिक कर्मचारी आणि रुग्णालयातील वीजतंत्री दर आठवड्याला त्याची पाहणी करतात. त्यामुळे रुग्णालयात व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आजच रुग्णालयाचे आणि एसएनसीयूचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे सूचित केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने फायर ऑडिट यापूर्वी केले आहे. आता परत ऑडिट करण्याविषयी पत्र दिले आहे. तसेच, पी.डब्ल्यू.डी. विभागाला देखील फायर ऑडिटविषयी सूचना केल्या आहेत.
उपाययोजना काय?
पुणे जिल्हा रुग्णालयात असलेल्या नवजात शिशू अतिदक्षता कक्ष 24 खाटांचा आहे. सध्या येथे 11 बालकांवर उपचार सुरू आहेत. संबंधित कक्षातून आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. कक्षामध्ये दररोज वेळोवेळी स्वच्छता केली जाते. करोना काळातही हे नवजात शिशू अतिदक्षता कक्ष सुरू होते. कक्षामध्ये बालकांना ऑक्सिजन देण्याची सुविधा आहे. अवघ्या 600 ग्रॅम वजनाच्या नवजात बालकांपासून कक्षात उपचार केले जातात. त्यांचे प्राण वाचविण्यात येथील रुग्णालय प्रशासनाला वेळोवेळी यश आलेले आहे. संबंधित कक्षामध्ये रात्रपाळीला 1 वैद्यकीय अधिकारी, 1 निवासी वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिका उपस्थित असतात, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांनी दिली.