इस्लामपूर (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना मारहाणीचा प्रयत्न व जीवे मारण्याची धमकी देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांना नगरसेवकपद रद्द का करू नये? अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी बजावली आहे. बुधवार दि.२७ मे पर्यंत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी, इस्लामपूर शहरातील कंटेन्मेंट झोनमधील क्षेत्रातच इस्लामपूर नगरपालिकेचे
स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या भावजयीच्या नावावर हॉटेल न्यु राजभवन या नावाचे बिअरबार परमिट रुम होते. केटेन्मेंट झोन असताना तसेच संचारबंदी असताना या बिअरबार मधून इस्लामपूर नगरपालिकेकडील घंटागाडीमधून दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार नगरसेवक अमित ओसवाल यांनी इस्लामपूर नगरपातिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्याकडे दि.२८ एप्रिल रोजी आली.
दरम्यान नगरसेवक खंडेराव जाधव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या केबीनमध्ये जावून केबीन मधील खुर्ची उचलून मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांना मारण्यासाठी धावून गेला. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देवून अश्लील शिविगाळ केली. याप्रकरणी खंडेराव जाधववर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान खंडेराव जाधव यांनी इस्लामपूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन न्यायाधीशांनी फेटाळला होता.
इस्लामपूर पोलिसांनी गतीने तपास करून खंडेराव जाधव यास दि.१० मे २०२० रोजी अंबाघाट येथीत फार्महाऊस मधून ताब्यात घेवून अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी ५ दिवसांची पोलिस कोठडीही ठोठावली होती. दरम्यान इस्लामपूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांना नगरसेवक पदावरून बडतर्फ करावे तसेच
भविष्यात त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
नगरसेवक खंडेराव जाधव यांच्यावर स्वीकृत नगरसेवकपदाचा गैरवापर करुन प्रतिबंध काळात मद्यवाहतूक करून विल्हेवाट लावणे तसेच सरकारी कामात अडथळा, महिला अधिकाऱ्यास शिवीगाळीसाठी जबाबदार धरुन महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९६५ चे कलम ४२ प्रमाणे नगरसेवक पद रद्द करावे असे निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवार दि.२१ मे रोजी नोटीस दिली असून २७ मे पर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.