पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४४९ टपाली मतपत्रिकांचे वितरण

पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघात 449 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. पोस्टामार्फत आलेल्या मतपत्रिकाच त्यामध्ये गृहित धरण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या टपाली मतांचा मात्र विचार केला जाणार नाही. पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 53 हजार 545 मतदार आहेत.

त्यामध्ये पुरूष मतदार 1 लाख 85 हजार 939 तर, महिला मतदार 1 लाख 67 हजार 600 इतके आहेत. तृतीयपंथी अन्य मतदार 6 आहेत. ही संख्या 23 सप्टेंबरपर्यंत नवमतदार नावनोंदणी मोहीम राबविली तेव्हापर्यंतची आहे. या सर्व मतदारांना 21 तारखेला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यापैकी 449 जणांना टपाली मतदानासाठी मतपत्रिका दिलेल्या आहेत.

निवडणूक कामात व्यस्त असलेले आणि बाहेरगावी असलेल्या मतदारांना टपाली मतदान करता येते. त्यामध्ये निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच बंदोबस्तासाठी असलेले भारतीय लष्करी जवान आणि पोलीस यांचा सर्वाधिक समावेश आहे. टपाली मतपत्रिका प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन येथे स्वीकारली जात आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.