चर्चेत : का सोडले कर्णधारपद?

नितीन कुलकर्णी

भारताच्या यशस्वी कर्णधारात सामील असलेल्या विराट कोहलीने टी-20 विश्‍वचषक झाल्यानंतर भारतीय टी-20 चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. या घोषणेने क्रिकेट विश्‍वात फारशी खळबळ उडालेली नाही. त्याबाबत मीमांसा…

भारताचा 32 वर्षीय कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मोठे यश मिळवले आहे. तरीही त्याच्यावर एकही आयसीसी चषक न जिंकल्याचा ठपका ठेवण्यात येतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आणि आयसीसीच्या उपांत्य सामन्यात पराभव झाला आहे.

याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असताना आतापर्यंत आयपीएल जिंकू शकला नाही. सतत धावांचा पाऊस पाडणारा विराट देशाला मोठे यश मिळवून देण्यास फारसा यशस्वी ठरला नाही. कोहलीने टी-20 विश्‍वचषकानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आहे.

त्यापाठोपाठ आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्सचे कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या निर्णयाने भारतीय क्रिकेट वर्तुळात फारशी खळबळ माजलेली नाही. एका अर्थाने त्याच्या फलंदाजीसाठी हा निर्णय गरजेचा होता, असेही म्हटले जात आहे.

विराट कोहलीचा भारताच्या यशस्वी कर्णधारात समावेश होतो. त्याने कर्णधारपद सोडण्याबाबतची चर्चा अगोदरपासूनच सुरू होती. या मागे कर्णधारपदाचे ओझे हे एक कारण सांगितले जात आहे. वास्तविक करोनामुळे मार्च 2020 पासून क्रिकेटचे खेळ मंदावलेले असताना विराटने केवळ आठच टी-20 सामने खेळले आहे.

त्यामुळे कामाचे ओझे असण्याचे कारण फारसे संयुक्‍तिक वाटत नाही. अर्थात, गेल्या काही काळापासून विराटची बॅट थंडावलेली असल्याने त्याच्या दबावापोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे क्रिकेट तज्ज्ञ म्हणतात.

भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यासंदर्भात मांडलेले मत पटण्यासारखे आहे. ते म्हणतात की, एखादी स्पर्धा जिंकली नाही तर कर्णधारांवर अपेक्षांचे ओझे आणखीच वाढते. या मतात तथ्य आहे. विराट कोहली देखील अशा प्रकारच्या अपेक्षेखाली दबला आहे.

यंदा कसोटीच्या विश्‍व चॅम्पियन्समध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर त्याच्यावरचा दबाव आणखी वाढला. अर्थात, तो तिन्ही श्रेणीत यशस्वी ठरला आहे. त्याने टी-20 चे 28 जानेवारी 2017 रोजी भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. या श्रेणीत तो पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदनंतर सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.

सर्फराजने 33 पैकी 25 सामने जिंकले आणि त्याची विजयाची सरासरी 75.75 टक्‍के आहे. तर विराटने 45 पैकी 29 सामने जिंकले असून त्याची विजयाची सरासरी 67.44 टक्‍के आहे. याप्रमाणे विराटचा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांतील विक्रमदेखील दमदार आहे. एकंदरित त्याने तिन्ही प्रकारात धावांचा पाऊस पाडला आहे.

असे असताना कर्णधारपद सोडण्याची मानसिकता आपण समजू शकतो. पदाचा दबाव आणि फलंदाजीतील सूर हरवणे ही बाब लक्षात येते. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला देखील कर्णधार म्हणून फारसे यश आले नाही. असाच अनुभव कोहलीला देखील येत आहे. 2017 मध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर टी-20 मध्ये कर्णधार झालेल्या विराट कोहलीने कर्णधार म्हणून 45 टी-20 सामन्यात 1502 धावा केल्या.

त्याची सरासरी 48.45 राहिली आहे आणि स्ट्राइक रेट 143.18 राहिला. त्याने 12 वेळेस अर्धशतक ठोकले आहे. 94 वर तो नाबाद राहिला असून ती त्याची सर्वाधिक वैयक्‍तिक धावसंख्या मानली जाते. कोहलीने एकूण 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने 28 अर्धशतके लगावले आहेत. यातून त्याने 3,159 धावा तडकावल्या आहेत. 2017 नंतर कोहली हा टी-20 मध्ये सर्वाधिक धावा काढणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे.

विराटची तिन्ही प्रकारातील सरासरी ही 50 पेक्षा अधिक आहे. पण 2020 पासून ते आजतागायत विराटने 12 कसोटीत केवळ 26.8 टक्‍के सरासरीने धावा काढल्या. या काळात तिन्ही प्रकारात खेळल्या गेलेल्या 53 डावांत एकही शतक ठोकू शकला नाही.

तो साधारणपणे वर्षभरात सात ते आठ शतकं ठोकायचा. 2018 मध्ये 11 तर 2019 मध्ये सात शतके ठोकली होती. परंतु विराटसारख्या सक्षम फलंदाजाच्या फलंदाजीतून जर दोन वर्षे शतक झळकत नसेल तर दबाव निर्माण होणे साहजिकच आहे. म्हणून तो टी-20 विश्‍वचषकानंतर कर्णधारपदावरून दूर होईल आणि त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळेल.

यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. अर्थात, विराटला आपल्या टीकाकारांची तोंड गप्प करण्याची संधी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत मिळणार आहे. जर तो टी-20 विश्‍वचषक जिंकू शकला नाही तर त्याच्यावर एकदिवसीय सामन्याचे कर्णधारपद सोडण्याबाबतही दबाव राहू शकतो. यामागचे कारण म्हणजे एकदिवसीय सामन्याची विश्‍वचषक स्पर्धा 2023 मध्ये भारतातच होणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर भारताने विश्‍वकरंडक जिंकावा ही सर्वांचीच इच्छा असेल.

त्यामुळे विजयाची हमी देणाऱ्या खेळाडूलाच कर्णधारपदी निवडण्याबाबत क्रिकेट व्यवस्थापन आग्रही राहू शकते. अर्थात, विराट कोहलीसारख्या दमदार खेळाडूच्या मनात क्रिकेटमधून सन्मानाने बाहेर पडण्याचे विचार घोळत असेल. म्हणून यासाठी त्याला कोणत्याही दबावाशिवाय फलंदाजी करणे गरजेचे आहे. भारतासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे रोहित शर्माच्या रूपाने एक चांगला तयार कर्णधार संघ व्यवस्थापनाच्या भात्यात आहे.

रोहित शर्माचा विचार केल्यास आतापर्यंत त्याने 18 टी-20 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. रोहित शर्माने 15 सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या यशाचे प्रमाण 78 टक्‍के आहे. तसेच आयपीएलमध्ये देखील त्याची शानदार कामगिरी आहे. त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळेस चॅम्पियन्स केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.