नवी दिल्ली – कॉंग्रेस आणि आपमध्ये सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. ती अनिर्णित राहिल्याने चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. दोन्ही पक्षांतील चर्चेमुळे ते दिल्ली आणि पंजाबमध्ये एकत्रितपणे लढण्यास राजी असल्याचे सूचित होत आहे.
विरोधी पक्षांची देशव्यापी आघाडी असणाऱ्या इंडियाच्या गोटात जागावाटप निश्चित करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्या आघाडीतील महत्वाचा घटक असणाऱ्या कॉंग्रेसने इतर पक्षांसमवेत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. त्यानुसार, कॉंग्रेस आणि आपमध्ये बैठक झाली. त्या बैठकीला कॉंग्रेसच्या वतीने मुकूल वासनिक, अशोक गेहलोत, सलमान खुर्शिद, मोहन प्रकाश आणि अरविंदरसिंग लवली हे नेते उपस्थित होते.
आपचे प्रतिनिधित्व संदीप पाठक, आतिषी आणि सौरव भारद्वाज या नेत्यांनी केले. बैठकीतील चर्चेचा तपशील उघड करण्यात आला नाही. आणखी एका बैठकीनंतर जागावाटपाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याचे सूतोवाच वासनिक यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. त्यामुळे तो पक्ष अधिक जागा लढवण्यास आग्रही असल्याचे समजते. अर्थात, पंजाबमधील दोन्ही पक्षांच्या प्रादेशिक नेत्यांनी हातमिळवणी करण्याला वारंवार विरोध दर्शवला आहे. तसे असले तरी, दोन्ही पक्षांचे केंद्रीय नेतृत्व एकत्र लढण्यास अनुकूल असल्याचे ताज्या घडामोडीतून स्पष्ट झाले.