दौंड-पुणे शहरात करोना व्हायरस रोगाचे आठ संशयित रूग्ण आढळले आहेत. दौंड तालुक्यात या रोगाबाबत अनेक अफवांना सध्या पेव फुटले आहे. सध्या दौंड तालुक्याच्या लगत असणाऱ्या मांजरीमध्ये करोना रोगाचे रूग्ण आढळल्याची अफवा पसरली आहे. त्याच्यामुळे तालुक्यातील चौकाचौकात व पारावर चर्चा सुरू आहे. यात अनेक तर्कवितर्क लढविले जात असून अनेक वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत.
या तर्कवितर्कांमधून गोवऱ्या जाळणे, देशी दारू अंगाला चोळणे, तंबाखूजन्य पदार्थ खाल्यावर करोनाची लागण होत नाही. यापैकी जर नागरिकांनी असे उपाय केले तर त्याचा परिणाम निश्चितच शरीरावर होऊ शकतो. गावठी उपाय हे केले की करोना होत नाही असेही बोलले जाते. त्यामुळे करोना रोगाबाबत जनजागृतीची गरज तालुक्यात निर्माण झाली आहे.दौंड तालुक्यातून पुणे शहरात नोकरी व कामासाठी दररोज साधारणतः आठ ते दहा हजार नागरिक प्रवास करत असतात. रेल्वेस्थानकात ही जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. कारण दररोज दौंड ते पुणे ये-जा करणारे नागरिकांची संख्या जास्त आहे.
दौंड रेल्वेस्थानकावर परराज्यातून येणाऱ्या व उतरणाऱ्या नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे, मात्र सध्या अशी कोणतीही तपासणी दौंड रेल्वे स्थानकात होत नाही. तालुक्यात सध्या काही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी हात धुण्याचे हॅन्डवॉशचा वापरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या हॅन्डवॉशला तालुक्यातून मागणी वाढली आहे. पुणे शहरात करोना संशयित रुग्ण आढळल्यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामपंचायती, नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना प्रबोधन करणे गरजेचे आहे.