नवी दिल्ली – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झालेत. उभय नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून यावर विस्तृत चर्चा केली.
फडणवीस आणि बावनकुळे यांनी आज तातडीने दिल्ली गठून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात उभय नेत्यांनी विस्तृत चर्चा केली. मात्र, चर्चेचा तपशील उपलब्ध होवू शकला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे भविष्यात परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
महत्वाचे म्हणजे, गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक आज मुख्यालयात बोलाविली होती. फडणवीस आणि बावनकुळे हेही या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आजच्या बैठकीत कोणता तोडगा काढला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाचा मुद्या असा की, उत्तरप्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 48 जागा असून भाजपने 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशात, मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लक्ष्य गाठता येणार नाही, याची जाणीव भाजपला आहे.