संगमनेर -ज्येष्ठ व्यक्तींना करोनाची लागण झाल्यास ती जीवघेणी ठरते, असा आजवरचा समज संगमनेरातील कोविड रुग्णांसाठी सुरू झालेल्या घुलेवाडीतील कोविड केअर सेंटरने खोटा ठरविला. 73 वर्षीय व्यक्तीला नाशिकहून आणून संगमनेरातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आठ दिवस उपचार घेऊन या रुग्णाने करोनावर मात करत घर गाठले. मात्र एक रुग्ण घरी गेला, तर एका रुग्णात वाढ झाली आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भंवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर व डॉ. अमोल कासार उपस्थित होते. 11 जून रोजी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकाच्या 73 वर्षीय वडिलांना नाशिकहून संगमनेरला आणले गेले होते.
त्यांना घुलेवाडीच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून तेथेच त्यांच्यावर उपचार केले गेले. गेल्या आठच दिवसांत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने या 73 वर्षीय इसमावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरे केले. त्यांची पुन्हा एकदा स्त्राव चाचणी घेतली असता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना आज दुपारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकीकडे दररोज रुग्ण सापडत असल्याने भयभीत झालेल्या संगमनेरकरांना दुसरीकडे घुलेवाडीच्या कोविड केअर सेंटरमधून दररोज दिलासादायक वृत्त मिळू लागले आहे.
आत्तापर्यंत अकरा रुग्णांना मृत्यूच्या दारातून माघारी आणणाऱ्या व कोविड संक्रमितांसाठी संजीवनी ठरत असलेल्या कोविड सेंटरमधून आज चक्क एका 73 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने संगमनेरकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संपूर्ण राज्यात तालुकास्तरावर पहिल्यांदाच सुरू झालेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण अठरा करोना संक्रमित व्यक्तींवर उपचार सुरू होते. त्यातील बारा जणांनी येथील उपचारांच्या बळावर करोनाचा पराभव करीत घर गाठले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून 1 जूनपर्यंत बंद असलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत लोकसहभागातून सुरू करून कोविड केअर सेंटर उभे केले. त्यामुळे करोनाचे रुग्ण नगरला न पाठविता इथेच उपचार देऊन बरे होताहेत. आता पर्यंत 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजही 73 वर्षीय व्यक्तीने करोनावर मात केली असून, ते घरी गेले आहेत. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. मात्र नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, संगमनेर