पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची त्रिसदस्यीय प्रभागरचना नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये गतवेळेपेक्षा अनेक वॉर्ड नव्याने तयार झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे. तर अनेकांच्या हक्काचे मतदार दुसऱ्या प्रभागात जोडले गेल्याने इच्छुकांना पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. वेळ व पैसा खर्च करून इतके दिवस प्रभागामध्ये काम केले आहे. मात्र नव्या प्रभागरचनेने इच्छुकांची तारांबळ उडणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभागांचा प्रारुप आराखडा जाहीर झाला आहे. ऑक्टोबर महिन्यांपासून याबाबतचे कामकाज सुरू होते. मात्र करोनाची तिसरी लाट, किती सदस्यांचा प्रभाग करायचा? याबाबतचा असलेला गोंधळ त्याच ओबीसी आरक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न यामुळे प्रभागरचनेला तब्बल तीन महिने उशीर झाला. निवडणूक म्हटले की अनेक हौसे- नवसे उमदेवार आपले नशिब अजमवातात.
पिंपरी चिंचवड शहरात देखील 2022 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वर्षभरापासून अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. 2017 साली असलेल्या प्रभागांचा आधार घेत मतदारांपर्यंत पोहोचण्यासही सुरुवात केल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. अनेक इच्छुकांनी मतदारापर्यंत पोहचण्यासाठी नव-नवीन युक्त्या वापरल्या होत्या. त्यामध्ये यशस्वी होत अनेक इच्छुकांनी जनसंपर्क तयार केला.
त्यासाठी प्रभागात विविध कार्यक्रम घेतले. तर अनेकांनी घरो-घरी जाऊन नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या होत्या. विजयाचा निर्धार करत इच्छुकांनी वेळ आणि पैसा खर्च केला. मात्र नव्याने झालेल्या प्रभागरचनेमुळे अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरले. काही जणांनी ज्या भागात तयारी केली त्यामधील निम्मा भाग तुटून दुसऱ्या प्रभागात जोडल्याने मतदार तुटले आहेत. परिणामी इच्छुकांना आता पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये निवड़णुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये मतदारार्यंत पोहचण्याचे दिव्य नव-इच्छुकांना पार पाडावे लागणार आहे.