रोगराई पसरण्याचा धोका : पदपथावर विक्रेत्यांनी केले अतिक्रमण
बिबवेवाडी – मार्केट यार्ड येथील भाजी मार्केट परिसरात मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. भाजी मार्केटजवळ मुख्य रस्त्यावर बरेच किरकोळ फळविक्रेते व फूल विक्रेत्यांनी पदपथावर दुकाने थाटली असून पदपथावर बेशिस्तपणे दुचाकी पार्क केल्याने नागरिकांसाठी चालण्यास पदपथ बंदच झाल्याचे चित्र आहे.
शहरातील मोठे व मुख्य भाजी मार्केट असल्याने येथे हजारोंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते; परंतु किरकोळ भाजी व फळे विक्रेते बाहेर अनधिकृतपणे व्यवसाय करतात व खराब भाजी व फळे रस्त्यालगत टाकतात. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले दृश्य पाहण्यास मिळते.
रस्त्यावर सुका कचरा वाऱ्यामुळे दुचाकी चालकांच्या डोळ्यात जातो. यामुळे किरकोळ अपघात होतात. येथील स्थानिक रहिवाशांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्याने चालताना नाक बंद दाबून चालावे लागते. या घाणीमुळे परिसरात डासांची पैदास वाढली आहे. बऱ्याच वेळा हे अनधिकृतपणे व्यवसाय करणारे व्यापारी हा कचरा रस्त्यालगतच जाळतात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच जवळच असलेल्या लालबाग व इतर रहिवासी सोसायट्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. यासर्व बाबीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पदपथावर अनधिकृत व्यावसायिकांमुळे व बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकी गाड्यांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्याने चालावे लागते. रस्त्यालगत टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे सोसायटीमध्ये नागरिक आजारी पडत आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांमुळे येथे चालत जाण्यासही भीती वाटत असून डुकरांचा वावर मोठा आहे.
अमित मुनोत, नागरिक