दिग्दर्शकांनी उलघडली चित्रपट निर्मितीमागची रंजक कथा

16व्या मिफ दरम्यान दिग्दर्शकांचा प्रसार माध्यमांशी संवाद

मुंबईत फिल्म्स डिव्हिजन इथे सुरु असलेल्या 16व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी ‘लदाख चले रिक्षावाला’ चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शक इंद्राणी चक्रबर्ती, ‘बैतुल्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक जितेंद्र राय आणि ‘पेरिहा डॉग’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेस्सी अल्क या तिघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या चित्रपटांच्या निर्मितीची कथा त्यांनी यावेळी सांगितली.

‘लदाख चले रिक्षावाला’ हा चित्रपट सायकल रिक्षाने कोलकत्याहून लदाखला जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या रिक्षावाल्याच्या खऱ्या प्रवासाचे रंजक चित्रिकरण आहे. रिक्षाने लदाखला जाण्याचे साहस, अशा अद्वितीय साहसाला कॅमेरात पकडण्याची दिग्दर्शिका आणि चमूची जिद्ध आणि भन्नाट स्वप्ने बघणाऱ्या रिक्षावाल्याच्या पत्नीची व्यथा अशा सर्व पैलूंना या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शिकेने केला आहे. कोलकाताच्या रस्त्यावर अचानक एका रिक्षावाल्याची भेट झाली आणि त्याने इंद्राणी चक्रबर्तींना आपल्या या वेगळ्याच छंदाविषयी सांगितले. याआधीही त्याने जम्मू, श्रीनगर अशा ठिकाणी सायकल रिक्षाने जाण्याचे साहस केले आहे, हे कळल्यावर हा रिक्षेवाला लदाखलाही जाईलच अशी खात्री त्यांना वाटली. ही अद्‌भूत सफर आपण कॅमेऱ्यात कैद केली पाहिजे, अशी इच्छा त्यांना झाली. मात्र रिक्षेवाल्यासोबत चमू घेऊन जात चित्रिकरण करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. पण प्रवासाचे काही तरी चित्रिकरण झालेच पाहिजे अशी तीव्र इच्छा त्यांना गप्प बसू देत नव्हती. शेवटी यावर तोडगा म्हणून त्यांचा हॅडीकॅम त्यांनी रिक्षावाल्याला दिला, तो वापरण्याचे तंत्र शिकवले आणि त्यालाच स्वत: शुटिंग करायला शिकवले. रिक्षावाला झारखंडला पोहोचल्यावर कॅमेरा खराब झाला, मात्र त्या अडचणींवरही त्यांनी मात केली. अशा अनेक अडचणी या प्रवासात त्यांना येत होत्या. लदाखच्या दुर्गम आणि अति थंड प्रदेशात सायकल रिक्षाने प्रवास करतांना रिक्षावाल्याला चित्रिकरण करणे जड जाईल, हे जाणवल्यावर चक्रबर्ती स्वत: लदाखला गेल्या आणि उरलेले चित्रिकरण पूर्ण केले.

हा छंद जोपासणे आणि तो पूर्ण करणे कौतुकास्पद आणि साहसी आहे, मात्र त्याच वेळी अशा छंदामुळे घर-संसाराकडे दुर्लक्ष होत ही बाबही नाकारता येत नाही. दिग्दर्शिकेने हा पैलूही समजून घेत, या रिक्षेवाल्याच्या पत्नीची व्यथाही या चित्रपटात दाखवली आहे. तीन चाकांच्या रिक्षावर आधारीत या सिनेमात हे तीन पैलू दाखवण्याचा प्रयोग चक्रबर्ती यांनी केला आहे.

युवा दिग्दर्शक जितेंद्र राय यांचा ‘कप ऑफ टी’ हा लघुपट अत्यंत लोकप्रिय झाला होता. शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाची शैक्षणिक ओढ केवळ 2 मिनिटांच्या लघुपटात अत्यंत ताकदीने मांडणाऱ्या ‘कप ऑफ टी’ या सिनेमाला सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमधूनच राय यांना ‘बैतुल्ला’ या लघुपटाची कथा सुचली. हाही चित्रपट बाल मजूरी या विषयावरच आधारीत आहे. बाल मजूरांना देखिल सर्वसामान्य मुलांसारखेच स्वप्न, आकांक्षा आणि इच्छा असतात, मात्र त्यांना आधार देणारे कोणी मिळाले तरच ते आपली स्वप्न पूर्ण करु शकतील, असा संदेश हा चित्रपट देतो. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण जितेंद्र राय यांनी मुंबईतल्या मोहम्मद अली मार्गावर केले आहे. यावेळी तिथल्या लोकांनी खूप सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

जितेंद्र राय यांनी या आधी मकरंद देशपांडे यांच्यासोबत नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच अमोल गुप्ते यांच्या ‘स्टॅनले का डिब्बा’ या चित्रपटातही सहाय्यक म्हणून काम केले आहे. चित्रपट करतांना काही आव्हाने आली, मात्र कलाकार आणि इतर चमूच्या सहकार्यामुळे चांगली कलाकृती बनवता आली असे समाधान त्यांनी व्यक्त केले. ओम कनोजिया या बाल कलाकाराने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे.

अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक जेस्सी अल्क यांचा ‘पेरहा डॉग’ हा चित्रपट कोलकातातल्या भटक्या कुत्र्यांविषयी आहे. या कुत्र्यांचे एकाकी आयुष्य त्यांना कोणाच्या तरी प्रेमाची गरज ओळखून त्यांना आधार देणाऱ्या लोकांची कथा या माहितीपटात मांडली आहे. 77 मिनिटांच्या या माहितीपटासाठी अल्क यांनी 165 तासांचे चित्रिकरण केले होते. त्यामुळे चित्रपट संकलन मोठे आव्हान होते, असे अल्क यांनी सांगितले. हा चित्रपट तयार करायला 5 वर्षे लागली, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.