विसगाव खोरे – भोर तालुक्यातील विसगाव खोरे येथील भोर-आंबाडखिंड हा मांढरदेवी, वाई,पाचगणी, महाबळेश्वर या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हजारो वाहने या मार्गाने दररोज ये-जा करतात. सध्या पावसाळा असल्याने या रस्त्याच्या कडेने झुडपांची आणि वेलींची वाटढ मोठ्या प्रमाणावर झाली असून, या झाडीझुडपात दिशादर्शक फलक झाकले गेले आहेत.
भोर-अंबाडखिंड या मार्गावर वाढलेल्या या झुडपांमुळे पर्यटक व वाहन चालकांना धोकादायक ठिकाणे, स्पीड ब्रेकर, वाहनांचा वेग, धोकादायक वळणे, झेब्रा क्रॉंसिग, एकेरी मार्ग दाखविणारे फलक दिसत नाहीत, त्यामुळे नवीन चालक व पर्यटक यांना चालवताना अडचण निर्माण होत आहे, तसेच या रस्त्यावर नऊ ते दहा ठिकाणचे ओढ्या-नाल्यांवरील छोटे-छोटे पूल (मोऱ्या) पावसामुळे नादुरुस्त होऊन ढासळले आहेत आणि काही ठिकाणी पुलाचे कठडे तुटले आहेत.
भांबवडी गावाजवळील पूल अरुंद असल्याने आणि या पुलाचे कठडे तुटल्याने वारंवार येथे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेतण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलकावर वाढलेली झाडी हटवावीत, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून होत आहे.