नायिका दिशा पटनी ही सध्या “मलंग’ या आगामी चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. पण अनेकांना हे माहीत नसेल की या चित्रपटासाठी नायिका म्हणून आधी दिशाची निवड झालेलीच नव्हती. किंबहुना, दिग्दर्शक मोहित सुरी याची पहिली पसंती दिशाला नव्हती. मोहितने आधी कृती सेननला या भूमिकेसाठी प्रस्ताव दिला होता.
मात्र त्यावेळी कृतीला “हाऊसफुल 4′ आणि “पानिपत’ या चित्रपटांसाठीचे प्रस्ताव आले होते. त्यामुळे तिने हा प्रस्ताव नाकारला. वास्तविक, कृतीने सिनेमाची पटकथा वाचली होती, तिला आवडलीही होती. मोहितसोबत कृतीची तारखांविषयीची चर्चाही सुरु होती. पण काही कारणास्तव तिने “हाऊसफुल4′ आणि “पानिपत’ला प्राधान्य देण्याचे ठरवले.
अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर अभिनीत “मलंग’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रसिद्ध झाले आहे आणि त्याला चांगली पसंतीही मिळत आहे. ही एक सायकोथ्रीलर फिल्म आहे. चित्रपटात दिशा आणि आदित्य यांचा ऑनस्क्रिन रोमान्स पाहायला मिळणार आहे. सलमानच्या “भारत’ या चित्रपटानंतर जवळपास एक वर्षांनी दिशा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.