वाठार पोलिसांची कारवाई; सहा गुन्ह्यांची कबुली
वाठार स्टेशन – कोरेगाव तालुक्यातील वाठार, तळीये, बिचुकले, अरबवाडी गावांमध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीस वाठार पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. जेरबंद करण्यात आलेल्या पाच संशयितांमध्ये एका जण अल्पवयीन आहे. चोरट्यांकडून एलईडी टीव्ही, वजन काटा, दीड तोळ्याचा सोन्याचा दागिना तसेच दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
अधिक माहिती अशी, गत तिन महिन्यांमध्ये वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठारसह तळीये, बिचुकले, अरबवाडी या गावांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घरफोड्यांचा तपास घेत असताना घरफोड्या करणारी टोळीच पोलिसांच्या हाताला लागली आहे.
यामध्ये प्रदीप प्रकाश माने (वय 26, रा. वाठार स्टेशन), विजय बाळू जाधव (वय 19, रा. भाडळे), अक्षय बाजीराव दोरके (वय 20, रा. वाठार स्टेशन), इर्शाद हारून मुल्ला (वय 36, रा. वाठार स्टेशन) तसेच एक अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. पोलिसांनी चोरट्यांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सहा घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्यांकडून एलईडी टीव्ही, वजन काटा, दीड तोळ्याचा सोन्याचा दागिना तसेच दुचाकी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस स्टेशनचे सपोनी स्वप्नील घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, सहाय्यक फौजदार गुजर, यादव, हवालदार नितीन भोसले, चोरट, तानाजी चव्हाण, सचिन जगताप, गहिन, नितीन पवार, खरात, तुषार आडके यांनी केला.
दरम्यान, वाठार स्टेशन परिसरात आणखी काही घरफोडी, आणि चोरीचे प्रकार घडले असल्यास नागरिकांनी वाठार पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.