कोव्हॅक्‍सिन लसींचा चौदा राज्यांना थेट पुरवठा

पण कोटा केंद्रानेच ठरवला

नवी दिल्ली, दि. 10 – भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्‍सिन या करोनावरील लसींचे 14 राज्यांना थेट वाटप केले आहे. ही माहिती कंपनीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी दिली. तथापि, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसारच राज्यांना हे थेट वाटप करण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

कोणत्या राज्यांना किती लसी द्यायच्या याची सूचना केंद्र सरकारने केली होती त्यानुसार हे वाटप करण्यात आले. कंपनीकडे अन्य राज्यांतूनही लसींची मागणी होत आहे. पण त्यांना उपलब्धतेनुसार हा पुरवठा केला जाईल असे भारत बायोटेक कंपनीकडून सांगण्यात आले. ज्या चौदा राज्यांना थेट लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

त्यात आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्‍मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. थेट राज्यांना ज्या लसी पुरवल्या जात आहेत त्याच्या किमतीतही भारत बायोटकने कपात केली आहे. आधी ही लसी प्रत्येकी सहाशे रुपयांना दिली जाईल असे जाहीर केले होते, त्याची किंमत आता 400 रुपये इतकी करण्यात आली आहे. केंद्र सरकारला मात्र या लसीचा प्रत्येकी दीडशे रुपयांनीच पुरवठा केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.