नवी दिल्ली – मद्य घोटाळ्यातील कथित साऊथ लॉबीशी भाजपचेच संबंध असून ईडीने त्याची चौकशी करून दाखवावी असे नवे आव्हान आज आम आदमी पक्षातर्फे देण्यात आले आहे. अबकारी धोरण घोटाळ्यातील एका साक्षीदाराचा आणि भाजपचा एकमेकांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप आपने केला असून त्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आज आप पक्षातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी, ज्यांचा मुलगा राघव मागुंता रेड्डी याला अबकारी धोरण प्रकरणी ईडीने अटक केली होती, त्याला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्ष टीडीपीने रिंगणात उतरवले आहे, असा आरोप ज्येष्ठ आप नेते आणि दिल्लीचे मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी एका पत्रकार परिषदेत केला. अतिशी म्हणाल्या की, मी ईडीला आव्हान देते की जर ही स्वतंत्र एजन्सी असेल तर त्यांनी या संबंधाची नोंद करून त्याची चौकशी करावी, तथाकथित साऊथ लॉबीशी भाजपचेच संबंध आहेत असे त्या म्हणाल्या.
आपच्या आरोपावर भाजपकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी, अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल विरुद्धचा आणखी एक साक्षीदार, सरथ रेड्डी याने निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला ५५ कोटी रुपये दिले होते, ज्यामुळे पक्षाचा दक्षिण लॉबीशी संबंध असल्याचे सिद्ध होते,असे त्या म्हणाल्या. ईडीकडून साक्षीदारांचा केजरीवाल यांच्या विरोधात कबुली जबाब मिळेपर्यंत त्यांचा छळ केला जात आहे. किंबहुना हा जबाब त्यांच्याकडून जबरदस्तीनेच वदवून घेतला जात आहे असे त्या म्हणाल्या.
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनाही ईडीने समन्स बजावले होते त्यावर बोलताना अतिशी म्हणाल्या, ते मला, भारद्वाज आणि इतर आप नेत्यांना बोलावून आम्हाला अटक करू शकतात पण आम्ही तुरुंगात जाण्यास घाबरत नाही.