Dil Chahta Hai : ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) या सिनेमाला 23 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) एक पोस्ट शेअर केली आहे. 2001 मध्ये या चित्रपटातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात दाखवण्यात आलेला तीन मित्रांचा प्रवास प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. आजही हा चित्रपट अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेला चापोरा किल्ल्याचा व्हिडिओ फरहान अख्तरने शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्याने ‘दिल चाहता है’ चित्रपटाला 23 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या किल्लाला पुन्हा एकदा भेट दिली आहे.
फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फरहान गोव्यातील चापोरा किल्ल्याच्या भिंतीवर लेखक शुजात सौदागर यांच्यासोबत बसलेला दिसत आहेत. ही तीच जागा आहे जिथे या चित्रपटातील तिघे मित्र (आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना) बसून आयुष्याबद्दल बोलत होते.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करताना फरहानने लिहिले की, ‘आकाश, सिड आणि समीर यांच्या जीवनाचं चित्रीकरण केल्यानंतर पहिल्यांदाच चापोरा किल्ल्यावर परतलो. हे सर्व 23 वर्षांपूर्वी घडलं होतं. बरेच काही बदलले आहे परंतु गोव्यातील उबदार आणि समुद्राची खारी हवा तशीच आहे. काही ठिकाणे फक्त जादुई असतात.” या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत या दिल चाहता है चा सिक्वेल बनवावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, दिल चाहता है हा फरहान अख्तरचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. या सिनेमात आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांनी आकाश, समीर आणि सीड ही भूमिका साकारली होती. याशिवाय या सिनेमात डिंपल कपाडीया, प्रिती झिंटा आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली होती.