फलटण -माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, स्वराज कारखाना व्यवस्थापन व पतसंस्थेने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करून, कारवाईच्या मागणीसाठी येथील अधिकारगृहाबाहेर बेमुदत उपोषणाला बसलेल्या दिगंबर आगवणे यांना गुरुवारी पोलिसांनी सातारा येथे क्रांतिसिंह नाना रुग्णालयात उपचारांसाठी हलवले.
आगवणे यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असतानाही, ते उपचार घेण्यास तयार नसल्याने पोलिसांना जबरदस्ती करावी लागली. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप करून, दिगंबर आगवणे यांनी अधिकारगृहासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांची गुरुवारी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना वैद्यकीय उपचारांची नितांत आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले; परंतु उपचार घेण्यास आगवणे यांनी नकार दिला.
त्यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व त्यांच्या पथकाने आगवणे यांना जबरदस्तीने गाडीत बसवून वैद्यकीय उपचारांसाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात हलवले. तुम्ही मला असा हात लावू शकत नाही? तुम्ही लोकशाही मोडत आहात. मी गळफास घेईन. मला न्याय मिळेपर्यंत उपोषणाला बसणार आहे, असे म्हणत पोलिसांना आगवणे यांनी विरोध केला; परंतु पोलिसांनी त्यांना साताऱ्याला नेले. दरम्यान, उपोषणस्थळी हा प्रकार सुरू असताना बघ्यांनी गर्दी केली होती.