शिवशंकर निरगुडे
हिंगोली : ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे देहदान आणि अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे. एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो डॉक्टर घडत आहेत. तर एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, डोळे या अवयवांच्या दानामुळे किमान सहा व्यक्तींना नवीन आयुष्य मिळते. विविध माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीमुळे रक्तदान, नेत्रदानाबरोबर देहदान आणि अवयवदानात वाढ होत असून ही संकल्पना समाजात हळूहळू रुजू लागली आहे.
परभणीतील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक लक्ष्मणराव रुखमाजी काळे (वय 80) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार आज शनिवारी दिनांक 1 जुलै 2023 रोजी सकाळी नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे मरणोत्तर देहदान करण्यात आले. परभणी येथील कारेगाव रोडवरील विजयश्री नगरातील ज्येष्ठ नागरिक श्री लक्ष्मणराव रुखमाजी काळे यांचे शुक्रवारी दिनांक 30 जून 2023 रोजी रात्री 7.50 वाजता शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार भाऊ, भावजया, पत्नी, विवाहित मुलगी, तीन मुले, सूना- नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी (दि.1) सकाळी त्यांचे पार्थिव नांदेडसाठी रूग्णवाहिकेद्वारे देहदानांसाठी नेण्यात आले. श्री लक्ष्मणराव काळे हे मूळचे कुरुंदा (ता.वसमत जि.हिंगोली) येथील मूळ रहिवासी असून राज्य शासनाच्या सेवेतून सहायक कृषी सहायक या पदावरून 2001 साली निवृत्त झाले होते. तसेच विजयश्री सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात ते सक्रिय होते.
पत्रकार बाळासाहेब काळे आणि पिंगळी येथील विवेक वर्धिनी सेवाभावी संचलित डी.फार्मसी कॉलेजचे कर्मचारी संदीप काळे यांचे ते वडील होते. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस आणि पदव्युत्तर तसेच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान 8 ते 10 मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी या महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
देहदानाविषयी अंधश्रद्धा दूर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यात येत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मानवी अवयवांचे दान करून आणि अशा दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करून दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत घोषित करून कुटुंबियांच्या परवानगीने देता येणारे अवयवदान देऊन काही व्यक्तींना जीवदान आणि नवसंजीवनी देऊ शकतो, असे शरीररचनाशास्त्र विभागातील डॉक्टरांनी सांगितले.
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या मे महिन्यातच 4 व्यक्तींचे मरणोत्तर देहदान झाले आहे. रासायनिक प्रक्रियेनंतर हे मृतदेह अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षणात महत्वाची भूमिका बजावतात, असेही तेथील डॉक्टरांनी सांगितले.