जळोची- बारामती शहरातील प्रशासकीय भवन येथे मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य बारामती शहर व तालुका यांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतही आंदोलन करण्यात आले अनुसुचित जातीमध्ये आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड, याप्रमाणे वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, संसद भवन व विधान भवन याठिकाणी लहुजी वस्ताद साळवे व आण्णाभाऊ साठे यांचे पुतळे बसवण्यात यावेत.
या प्रमुख मागण्यांसह संगमवाडी पुणे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू कराव्यात, आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची सर्व कर्जे माफ करून नव्याने त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाने प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, बारामती तालुकाध्यक्ष राजेंद्र भिसे, बारामती शहराध्यक्ष अतुल गायकवाड, निलेश जाधव, अमोल इंगळे, अमोल भिसे, सचिन माने, यांसह अनेक आंदोलक उपस्थित होते.