नवी दिल्ली – उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले. संसदेत आणि संसदेबाहेरही तो विषय राजकीय केंद्रस्थानी आल्याचे पाहावयास मिळाले.
संसदेतील निलंबनसत्राचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी नव्या संसद भवनाबाहेर निदर्शने केली.
त्यावेळी विरोधकांनी प्रतिकात्मक संसदही भरवली. त्या निदर्शनांत सहभागी बॅनर्जी यांनी धनखड यांची मिमिक्री (नक्कल) केली. बॅनर्जी यांच्या त्या कृतीचा व्हिडीओ कॉंग्रेस नेते राहुल गांधी बनवताना दिसले. त्या प्रकारावरून धनखड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी उभे राहून धनखड यांना पाठिंबा दर्शवला.
तर, भाजपच्या नेत्यांनी देशभरातून प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीकेची झोड उठवली. निलंबनसत्रावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी सत्ताधारी मिमिक्रीचा विषय उपस्थित करत असल्याचा पलटवार विरोधकांकडून करण्यात आला. संसदेतून मोठ्या संख्येने विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले.
त्या कारवाईचा निषेध करण्यासाठी इंडिया ही विरोधकांची आघाडी २२ डिसेंबरला देशव्यापी निदर्शने करणार आहे. त्या निदर्शनांची हवा काढण्यासाठी भाजपने मिमिक्रीचा विषय आक्रमकपणे लावून धरल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.