कार्ला – नवरात्रोत्सवा निमित्त कार्ला येथील एकवीरा देवीच्या मंदिरात घटस्थापना झाली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक आले होते. त्यामुळे मंदीर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
एकवीरा मंदिरात घटस्थापनेची आठवी माळ व रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने पुणे, मुंबई, कोकणसह मावळ तालुक्यातील अनेक गावातील भाविक पहाटेपासून मंदीर परिसरात दाखल होण्यास सुरवात झाली. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गर्दीमुळे एकवीरा देवीचा गड रविवारी पहाटेपासूनच भाविक भक्तांनी फुलून गेला. दुपारी बारा वाजताच्या सुमारास भर उन्हात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या गडावरील भक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला.
रविवारी आणि मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी स्वतः वाहतूकीचे नियोजन आणि बंदोबस्ताची कमान सांभाळली. वाहनांच्या पार्किंगचे नियोजन पोलिसांनी आधीच केल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. तसेच चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस मित्र अशोक कुटे यांच्यासह शिवदुर्गचे स्वंयसेवक वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी मदत करत होते.
शनिवार व रविवारी रात्रभर दर्शन सुरु असल्याने हजारो भाविकांनी रात्रीच दर्शन घेतल्याने भाविक आंनद व्यक्त करत होते. तर भाविक भक्तांना सुलभतेने दर्शन होण्यासाठी एकविरा देवस्थान प्रशासकिय समितीचे प्रमुख तहसिलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळु गायकवाड पोलीस पाटील अनिल पडवळ व सर्व कर्मचारी व प्रशासनाच्या वतीन प्रयत्न करत होते.