मुंबई : भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचीही चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळण्याबाबत विधानसभेनेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्याविषयी विचारण्यात आले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात, तिथलं आता इलेक्शन आहे, तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, तुम्ही काळजी करु नका. भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत.”
पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवारांची घोषणा झाली त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं.
उलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली. याबद्दल केंद्रीय पातळीवरुन निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.