वाघोली – मांजरी खुर्द ते कोलवडी हद्दीत तीन दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर व वीज खांबाची नासधूस करण्यात आली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांजरी खुर्द ते कोलवडी (ता. हवेली) हद्दीत तीन दिवसांपूर्वीच एसएसएमआर योजनेंतर्गत वीजखांब व ट्रान्सफॉर्मरचे लिनिअर एन्टरप्राईजेस तर्फे काम करण्यात आले होते. तीनच दिवसांपूर्वी स्ट्रक्चर, ट्रान्सफॉर्मर व उभारण्यात आलेले पाच वीजखांबांची चोरट्यांनी नासधूस केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले होते. शासनाच्या मालमत्तेचे अशा प्रकारे नुकसान करणे योग्य नसून हे कृत्य निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया वाघोली परिसरातून उमटत आहेत. जेसीबीच्या सहायाने वीजखांब पाडण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लिनिअर एन्टरप्राईजेसचे किरण प्रकाश निंबाळकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.