संजय राठोड यांच्या राजीनाम्याने पोहरादेवीचे महंत संतापले; भाजपवर व्यक्त केला रोष

वाशीम –  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या आक्रमक भूमिकेवरून आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून पोहरादेवी मंदिर येथील महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा घेणे ही कारवाई अन्यायकारक आहे. केवळ विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ही कारवाई झाली आहे. चौकशी बाकी असताना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणे चुकीचे आहे. बंजारा समाजात त्यांच्या राजीनाम्यावरून नाराजी असल्याचं पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय राठोड यांची चौकशी केल्यानंतर कारवाई केली असती तर योग्य असते. या प्रकरणामुळे समाजाची नाहक बदनामी झाली आहे. मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली आहे. कोरोनाचा काळ ओसरल्यानंतर आम्ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, या बैठकीला संजय राठोड नक्की येतील’, असंही जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.

तत्पूर्वी महंत जितेंद्र महाराज यांनी आज सकाळी ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. संजय राठोड यांच्याबद्दल ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहे, त्याबद्दल सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती जितेंद्र महाराज यांनी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.