राजगुरूनगर | काळजी घ्या, पुन्हा हातपाय पसरवतोय करोना; एका दिवसात 17 पाॅझिटिव्ह

राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर करोनाने हातपाय पसरले असून २४ तासात तब्बल १७ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याने हाहाकार उडाला आहे. गेली आठवडाभरपासुन शहरात सरासरी चार ते पाच रुग्ण पॉझिटिव्ह  आढळत होते. मात्र मागील २४ तासात तब्बल १७ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी ५० पॉझिटिव्ह.

राजगुरूनगर शहर आणि परिसरात करोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत असून नागरिक काळजी घेत नसल्याने संख्या झपाट्याने वाढत आहे. राजगुरूनगर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे लग्न कार्यासाठी दूरवरून अनेकजण येत आहेत.

शासनाने मर्यादा घातली असली तरी त्यांवर कानाडोळा करीत साखरपुडे आणि लग्न धुमशान होत आहेत. लग्नानंतर सत्यनारायण रिसेप्शन मोठ्या गर्दीत होते आहे. शिवाय दशक्रिया विधीला मोठी गर्दी होत आहे. यातच तब्ब्ल ९० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूक झाल्याने अनेक गावांमध्ये मिरवणूक झाल्या लोक एकत्र आले आहेत.

यासह छोट्या मोठ्यांचे वाढदिवस एकत्रित केक कापून साजरे करण्याचा तालुक्यात पायंडा आहे.यातून हळुवारपणे करोना विषाणूने डोके वर काढले आहे.रुग्ण संख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे

राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी शहरानजीक असलेल्या गावांची हीच अवस्था झाली आहे. त्यात चाकण एमआयडीसी असलेल्या गावांमध्ये करोनाचा जास्त फ़ैलाव सुरु झाला आहे. तालुका पुन्हा  लॉकडाऊनच्या दिशेने झुकला असून प्रशासन लॉकडाऊनच्या निर्णयापर्यंत पोहचले आहे.

खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून तालुक्यात पुन्हा करोनाचा हाहाकार सुरु झाला आहे. नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतली असती तर ही परिस्थिती पुन्हा उद्भवली नसती असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

खेड तालुक्यात मागील २४ तासात चाकण ७, आळंदी ३ राजगुरूनगर १७, चांडोली १, कुरुळी ११, रासे १, मेदनकरवाडी २, होलेवाडी १, टाकळकरवाडी २, केळगाव १,दावडी १, काळेचीवाडी १ वाडा १, कनेरसर १ असे रुग्ण ५० पॉझिटिव्ह सापडले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.