पारनेर – येथील महर्षी पराशर ऋषी वारकरी सेवा मंडळ व मातोश्री प्रतिष्ठान आयोजित आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच भाऊसाहेब लामखडे व जनाबाई लामखडे या वारकरी दाम्पत्याचा हस्ते प्रस्थान सोहळा पार पडला. तत्पूर्वी नगराध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सपत्नीक माऊलींच्या पादुकांचे पाद्यपूजन केले. पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या हस्ते आरती झाल्यावर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली.
संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांची सजवलेल्या रथातून बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. आणे (जुन्नर, जि. पुणे) येथील रंगदास स्वामी वारकरी प्रशिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळा मिरवणुकीत रंगत आणली. टाळ, मृदंग, तसेच ज्ञानोबा, तुकोबा, विठोबाच्या गजराने बाजारपेठ दुमदुमून गेली होती. खालच्या वेशीतील हनुमान मंदिराजवळ गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
तेथेच प्रस्थान सोहळा मिरवणुकीची सांगता झाली. तेथून पायी दिंडी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. या वेळी दिंडी सोहळ्याचे आयोजक दिनेश औटी, शिक्षक नेते रा. या. औटी, विठ्ठल औटी, नंदकुमार दरेकर, विजय डोळ, भीमराव पठारे, प्रकाश घोडके, श्यामराव भालेकर, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
फुगडीचा आनंद
प्रस्थान सोहळा मिरवणुकीला भैरवनाथ मंदिरापासून सुरुवात झाली. त्या वेळी नगराध्यक्ष विजय औटी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, चंद्रकांत चेडे यांच्यासह वारीतील वारकऱ्यांनी फुगडीचा आनंद लुटला. पोलीस निरीक्षक गायकवाड आणि लहू महाराज शिंदे यांची फुगडी चांगलीच रंगली.