कडूस, (वार्ताहर)- जय भवानी जय शिवाजीचा जय घोष… अन् ढोल ताशाचा निनाद.. शिंग तुतारीची रणभेदी नाद, डीजेचा दणदणाट.. अंगावर शहारे आणणारे शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके… शिव प्रेमीचे आकर्षण ठरले.
छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील तरूण मावळे आणि पोवाड्यासाठी फेटा बांधलेल्या चिमुकल्या शिवकन्यांचा, महिलांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. रंगीत फुलांचा होणारा वर्षाव अशा जल्लोष पुर्ण वातावरणात गावातील तरूणांनी सामाजिक ऐक्याचा संदेश देऊन एकजूटीतून साकारलेल्या शिवजयंतीचा उत्सव एकत्रितपणे उत्साहात साजरा केला. शिवकालीन मर्दानी लाठी काठी, तलवार, दांडपट्टा, भाला, पाश अश्या शस्त्रांच्या जीवघेणी खेळांनी आणि लक्षवेधी मिरवणूकीने सहभागी नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
कडूस गावातील सर्व तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीवरून पायी आणलेल्या शिवज्योत व शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. पुतळ्याच्या सभोवती रंगीत फुलांची सजावट, दिव्यांचा झगमगाटाची विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
शिवप्रतिमेच्या मिरवणुकीला, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरांत आरती घेऊन, सामाजिक ऐक्याच्या घोषणा देत, शिस्तबद्ध पद्धतीने, मोठ्या संख्येने मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण बाजारपेठ भगव्या झेंडे आणि पताकांनी शिवमय दिसत होती. चौकाचौकात तसेच बाजारपेठेत भगवे झेंडे लावल्याने संपूर्ण वातावरण शिवमय दिसत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जय भवानी जय शिवाजी या घोषणांच्या निनादात, मर्दानी खेळांंची प्रात्यक्षिके दाखविली गेली. घोषणांबरोबरच आणि देव देवतांच्या सामुदायिक आरत्या म्हटल्या गेल्या. कार्यक्रमाची सांगता ध्येय मंत्राने करण्यात आली.