श्रीनिवास पाटील, दीपक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा – भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आज सातारा शहरात विराट शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल यांच्याकडे तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्यावतीने दीपक पवार यांचा उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे दाखल केला.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. शिवेंद्रसिंहराजे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केला होता.
पक्षश्रेष्ठींनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द पाळला नसल्याचा आरोप करत दीपक पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदासह जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली होती.
दरम्यान, उदयनराजे यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीकडून माजी खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे घोषित करून लोकसभा पोटनिवडणुकीच्या चर्चेतील हवाच काढून घेतल्याने राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कांताताई नलावडे, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर व मान्यवरांच्या उपस्थितीत उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी 1 ऑक्टोबर रोजी सातारा शहरात शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
त्यानंतर राष्ट्रवादीकडून आज दुपारी श्रीनिवास पाटील व दीपक पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी 12 वाजता गांधी मैदानावरून रॅलीस प्रारंभ झाला. आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झेंडे व शरद पवार यांचे फोटो असलेले बॅनर्स हातात धरले होते.
“शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडत राष्ट्रवादीची विराट रॅली मोती चौक, देवी चौक, पोलीस करमणूक केंद्र, पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावर आली. शिवतीर्थावर श्रीनिवास पाटील, दीपक पवार व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आली. तेथे श्रीनिवास पाटील यांनी पाच मान्यवरांसह कार्यालयात जाऊन लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. श्वेता सिंघल यांच्याकडे सादर केला. दरम्यान, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघासाठी दीपक पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे सादर केला.
निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आज शरद पवार यांच्यावरील भक्तीचे प्रदर्शन केले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारासाठी शक्तिप्रदर्शन केले. सह्याद्रीचा पुत्र दिल्लीला जावा, यासाठी मला आशीर्वाद द्या. यापूर्वी मी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवून जिंकली होती. त्या दहा वर्षात मी काय केले, असा प्रश्न विचारला जातो. माझ्या पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघात जाऊन पहा, तुम्हाला 100 कामे दिसल्याशिवाय राहणार नाहीत. खासदाराला रेल्वे, विमान, घर, गाडी, वीज फुकट असते. मग, मतदारसंघातील प्रश्न मांडायला अडचण काय आहे?