पिंपरी -व्हॅलेंटाईन डे’च्या पुर्वसंध्येला गुलाबाला मागणी वाढली असून, दरदेखील दुप्पट झाले आहेत. निर्यातक्षम गुलाबांची आवक काही प्रमाणात मंदावली असून, स्थानिक पातळीवरुन पुन्हा आवक सुरु झाल्याने खास गुलाबांचे बुके तयार केले जात आहेत. अगदी 100 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंतचे गुलाबाचे बुके बाजारात उपलब्ध आहेत.
व्हॅलेंटाईन डे’ निमित्त मावळातील डच गुलाब मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केला जातो. यंदादेखील गुलाबांची निर्यात झाली. 12 फेब्रुवारीपर्यंत निर्यातक्षम गुलाबांची निर्यात झाल्यानंतर, स्थानिक पातळीवर गुलाबांची आवक सुरु झाली आहे. एरव्ही प्रतिगडडी 70 ते 80 रुपये दराने होणारी डच गुलाबांची गडडी 300 ते 400 रुपयांवर पोचली आहे. तर साध्या गुलाबाची गडडी 50 ते 60 रुपयांवर पोचली आहे.
चिंचवड येथील फुलविक्रेते अतुल गोडांबे यांनी सांगितले की, एरव्ही दररोज 30 ते 50 गुलाब गडड्यांची विक्री होत असते; मात्र व्हॅलेंटाईनच्या दोन दिवसांच्या काळात किमान 100 गडड्यांची विक्री होत आहे. लाल गुलाबाच्या एका फुलाची विक्री 30 रुपये दराने होत आहे, तर साधा गुलाब 10 रुपयांना उपलब्ध आहे.
व्हॅलेंटाईन डे’ निमित्त भेटवस्तुंनी सजलेल्या बाजारपेठेत तरुणाईकडून खरेदीला प्राधान्य दिले जात होते. व्हॅलेंटाईनच्याआदल्यादिवश असलेल्या रविवारच्या सुट्टीनमित्त बाजारपेठेत रेंगाळणारी तरुणाई दिसत होत. बदामाच्या आकाराच्या सर्व प्रकारच्या भेटवस्तुंची मोठ्या प्रमाणावर विक्री जाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.