पुणे – शहरात यंदा दरवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण घटले असले तरी जुलै तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने भूगर्भातील पाण्याची पातळी जुलै तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वाढल्याने टॅंकरची मागणी महिन्याला सुमारे तीन हजार फेऱ्यांनी घटली आहे. जून महिन्यांत पावसाने दडी मारल्याने शहरात महिन्याला टॅंकरच्या मागणीचा आकडा 35 हजारांवर गेला होता. मात्र, ही मागणी सप्टेंबर अखेरीस कमी झाली असून 31 हजारांवर आल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
खडकवासला धरण साखळीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 3 टक्के कमी पाणीसाठा असला तरी शहर आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी आहे. दरम्यान, शहराचा वाढत असलेला विस्तार आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या काही गावांमध्येही बांधकामे झाली आहेत. पीएमआरडीए कडून या बांधकामांना परवानगी देताना. बांधकाम व्यावसायिक पाण्याची सुविधा देतील, असे हमीपत्र घेण्यात आले होते. प्रत्यक्षात पालिकेलाच पाणी पुरवावे लागत आहे.
सहा महिन्यांतील फेऱ्या
- एप्रिल – 33 हजार 643
- मे – 35 हजार 590
- जून – 35 हजार 216
- जुलै – 33 हजार 613
- ऑगस्ट – 31 हजार 892
- सप्टेंबर 31 हजार 965
- एकूण – 2 लाख 1919 फेऱ्या
जून महिन्यात वाढते मागणी
शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या टॅंकरची मागणी 10 ते 15 टक्के वाढते. तर पावसाळा सुरू होताच ही मागणी कमी होते. मात्र, या वर्षी मान्सूनने शहरात उशीरा हजेरी लावली, 19 जूननंतर शहरात मान्सून दाखल झाला. मात्र, प्रत्यक्षात पावसाला सुरूवात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली. त्यामुळे शहरातील वाढीव पाण्यासाठी शहरात जून महिन्यातही तब्बल 35 हजार 216 टॅंकर फेऱ्या झाल्या. जून 2022 मध्ये हीच संख्या 32 हजार 614 तर जून 2021 मध्ये 24 हजार 278 होती. त्यामुळे जून महिन्यात पावसाला होत असलेल्या विलंबामुळे पाण्याच्या टॅंकर वाढत असल्याचे चित्र आहे.