पिंपरी – मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थापकाला फोन करुन एका इसमाने आपण माजी मंत्री पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले व शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. शुक्रवारी (दि. 9) चिखली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवदास साधू चिलवंत (वय 41, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या सुरक्षेसाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. तक्रारदार शिवदास हे संबंधित सुरक्षा एजन्सीमध्ये व्यवस्थापक पदावर काम करतात. शुक्रवारी सकाळी घरी असताना त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
फोनवरील व्यक्ती, मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे, तू मूळचा उस्मानाबाद येथील असल्याचे आम्हाला समजले आहे. शिवाजीनगर येथील डीएमच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणून आरोपीने शिवदास यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. याबाबत पोलिसांनी तक्रारीची शहानिशा सुरू केली असून कोणीतरी खोडसाळपणा केला असण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी वर्तवली आहे.