पुणे – सध्या देशात उद्भवलेल्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशापुढे अनेक प्रकारची आव्हाने निर्माण झाली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी संकलनाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी डीआरडीओ या राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. विवेक अंबाडे यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: पीएम केअर्ससाठी व्यक्तीगत स्वरूपात एक लाख रूपयांची मदत दिली असून आपल्या अनेक सहकाऱ्यांनीही त्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
या संबंधातील एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करोना देशात सध्या स्टेट 2 च्या स्थितीत आहे. तो जर स्टेज 3 च्या स्थितीत गेला तर जी स्थिती उद्भवेल त्याला तोंड देणे खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असेल. यासाठी दोन्ही पातळीवरील सरकारे योग्य प्रयत्न करीत आहेतच पण अशा अवघड प्रसंगी सरकारवर मोठाच आर्थिक भार येणार असल्याने नागरीकांनी पीएम केअर्ससाठी किंवा राज्यपातळीवर मुख्यमंत्री सहायता निधीत दान करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सधन नागरीकांच्या मदती शिवाय या आव्हानाचा मुकाबला अवघड आहे असेही डॉ. अंबाडे यांनी म्हटले आहे.