सातारा -प्रकाशाचा उत्सव असलेला दीपावली सण जवळ आला आहे. रोषणाईचे अतूट असे नाते असलेल्या हा सण प्रकाशाने उजळून काढण्यासाठी पारंपारिक आणि काही नवे प्रकारातील आकर्षक पणत्यांनी बाजारपेठ सजली आहे. कासव, मासा पणती, कंदील लाईटसह आकर्षक डिझाईन असलेल्या पणत्यांनाही मोठी मागणी वाढली आहे. त्याच बरोबर रांगोळीचे लहान आणि मोठ्या आकारातील स्टीकर बाजारात आले आहेत. यासह मोती, फुलांचे तोरण, टिकाऊ फुलाची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे.
सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी सातारा जिल्ह्यात साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. आकर्षक पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. यावर्षी आकाश कंदिलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत.
आकर्षक पणत्या-प्रकाशासोबतच आनंद आणि उत्साहाची उधळण करणारा हा सण अधिक खुलतो. तो पणत्या आणि मातीच्या दिव्यांमुळेच. देवघरापासून ते अंगणापर्यंत सर्व परिसरात पणत्या लावण्याची प्रथा जोपासली जाते. पोवई नाका, राजवाडा, खण आळी, गोलबाग, बुधवार पेठेतील कुंभार वाडा येथे विविध प्रकारचे आकर्षक दिवे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये पाच पणती, डबल प्लेट पणती, कोलकाता पणती, कासव, मासा पणती, चायना मेड पणती अशा वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत.
खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टीकर बाजारात आले आहेत. यात शुभ लाभ, स्वतिक, पावले, श्री, ॐ आणि इतर सजावट साहित्यांचा समावेश आहे. यात कागदी, प्लास्टिक, पी.व्ही.सी, मेटालिक, अक्रॉलिक अशा अनेक प्रकारात दाखल असून त्याच बरोबर रांगोळीचे लहान आणि मोठ्या आकारातील स्टीकर बाजारात आले आहेत. यासह मोती तसेच फुलांचे तोरण, टिकाऊ फुलाची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली असून खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी होत आहे. रंगीबेरंगी कापडी, हॉलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगचे असंख्य प्रकारचे आकर्षक आकाश कंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. 50 रुपयांपासून आकाशदिवे उपलब्ध असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
रेडीमेड किल्लेही विक्रीला
साध्या पणत्या 20 रुपये तर आकर्षक पणत्या 150 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते राजुकुमार घोरपडे यांनी सांगितले. तर कासव तसेच मासा पणती, कंदील लाईटची किंमत प्रत्येकी 100 रुपयांच्या घरात आहे. तर बोळके 30 ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गायवासरुची मूर्ती 120 रुपयाला तर रेडिमेड किल्लेही विक्रीस आले असून सोबतीला लहान आकाराचे सैनिकांच्या मूर्ती देखील आहेत.
===================