पुणे – करोना बाधितांच्या जनुकीय संरचनेच्या तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्ये 80 टक्के “डेल्टा’ व्हेरियंटचे बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने अहवालात दिली आहे.
करोनाच्या डेल्टा आणि डेल्ट प्लस व्हेरियंटचा आवृत्तीचा किती प्रसार झाला आहे, हे तपासण्यासाठी महाराष्ट्र शासन करोना बाधितांच्या नमुन्यांची नियमितपणे तपासणी करत आहे. राज्य आरोग्य विभागाच्या महितीप्रमाणे, 76 रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली होती. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 71 जण बरे झाले आहेत. सध्या कोणत्याही डेल्टा प्लसच्या संसर्गित रुग्णावर उपचार सुरू नाहीत. विषाणूच्या आवृत्तीची परिणामकारकता तपासण्यासाठी आरोग्य विभागाने पाच प्रयोगशाळा आणि पाच रुग्णालयांची संवेदनशील केंद्रे म्हणून निवड केली आहे.
या प्रत्येक केंद्रातून राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे प्रत्येक पंधरवड्याला 15 नमुने जनुकीय संरचनेच्या अभ्यासासाठी पाठवण्यात येतात. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रीसर्चच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स आणि इंटिग्रेटी बायोलॉजी या नावाच्या लॅबोरेटरीशी करार केला आहे.
या लॅबोरेटरीने सोमवारी केलेल्या चाचण्यांमध्ये आणखी दहा नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस ही आवृत्ती आढळली. त्यातील 6 – कोल्हापूर, 3- रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एका नमुन्याचा समावेश आहे. आतापर्यंत डेल्टा प्लसचे 13 बाधित जळगावात, 15 रत्नागिरीत, सात कोल्हापुरात अणि ठाणे आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी सहा बाधित आढळले आहेत. पालघर आणि रायगडमध्ये प्रत्येकी तीन तसेच गोंदिया, सिंधूदुर्ग, नांदेडमध्ये प्रत्येकी दोन चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी एक बाधित आढळला आहे.
प्रत्येक शंभर नमुने तपासणीतून डेल्टा व्हेरियंटचे 80 टक्के रुग्ण सापडत आहे. मात्र, त्यातील पुढचा व्हेरियंट हा “डेल्टा प्लस’ आहे. या व्हेरियंटचे आतापर्यंत 76 रूग्ण आहेत. त्यातील 37 रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत. तर 71 रुग्ण बरे झाले असून, 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी