निवडणुकीमध्ये होणार भारतातील लोकशाहीच्या भविष्याचा निर्णय- जितेंद्र आव्हाड

चाळीसगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज चाळीसगाव येथे झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०१४ साली मोदींनी प्रत्येक भाषणात देशाला केवळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले. हे एकप्रकारचे मृगजळ होते आणि त्यामागे जनता लागली. पाच वर्षांत कोणती कामं केली यावर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत, पण पाकिस्तानच्या विषयावर मोदी मत मागतात. त्यांच्याकडे बाकी मुद्देच नाहीत, अशी टीका आव्हाड यांनी केली.

दहशतवादाचा उगम असलेला नथुराम गोडसे आणि त्याची पिलावळ म्हणजे हे भाजपाचे लोक आहेत. या निवडणुकीमध्ये भारताच्या व भारताच्या लोकशाहीच्या भविष्याचा निर्णय होणार आहे, असेही आव्हाड म्हणाले.

यांच्याकडे धनशक्तीचा वापर मोठया प्रमाणावर होतो, ही मगरूरी भाजपात वरपासून खालपर्यंत आहे. तुम्ही गोळवलकर गुरुजींच्या शाळेत शिकला आहात. आम्ही गांधीचे शिष्य आहोत. हिंमत असेल तर गोळवलकरांच्या नावाने मते मागा आम्ही गांधीजींच्या नावाने मागतो. मग निकाल पाहा काय लागतो, असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले.

देशात सर्वच अलबेल आहे अस समजू नका, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सांगतात. निवडणूक आयोगाने नमो टीव्ही बंद करण्याचे आदेश दिले असतानादेखील त्याचे उल्लंघन करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मोदींच्या काळात सर्वोच्च न्यायालय, आरबीआय, सीबीआय, निवडणूक आयोग या देशाच्या सर्वोच्च संस्था धोक्यात आल्या आहेत, अशी टीकादेखील आव्हाड यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.