ऋणानुबंध

नानांनी गॅलरीतून खाली डोकावलं आणि स्वतःच्याच मनाशी पुटपुटू लागले. “गोपाळ आणि दिनकर अजून कसे आले नाहीत? किती वाजलेत बघू तरी.’ असं म्हणत नाना आत आले. चष्मा पुसायला टेबलवर काही सापडतंय का म्हणून शोधू लागले आणि सवयीप्रमाणे, “शेवटी हा गंजिफ्राकच दरवेळी कामी पडतो.’ म्हणत ढेरीवरून चष्मा अलगद फिरवला. “पाच वाजायला अजून थोडा अवकाश आहे.

तोवर पाणी तापायला ठेवतो. हिला उठवायला नको.’ पाणी तापायला ठेवत नानांनी रेडिओ चालू केला. पहाटेचा कुठलातरी एक राग लागला होता. त्या आलापात नानांनी आपला सूर मिसळला आणि हातपाय धुताधुता “आ…….’ चा स्वर लावून, तो अमुक एक राग आवळताना नेहमीप्रमाणे त्यातही “हात’ धुऊन घेतला..!’ “”अरेच्च्या, तू कधी उठलीस?मी तर गजर बंद करून ठेवला होता.” नानी अंथरुणाच्या घड्या घालत, “”घड्याळातला गजर बंद केला; पण तुमच्या कंठातल्या गजराचं काय?” असं म्हणत हसू लागल्या.

“”तुला नक्‍की कंठातल्या असंच म्हणायचंय ना की कानठळ्या?” “”नाही हो. तुमचं आपलं काही तरीच.” तेवढ्यात खालून आवाज आला. “”माधव, उठलास का?” “”या झाल्या कानठळ्या!तुमचे मित्र आले वाटतं.” दोघे नवराबायको एकमेकांकडे पाहून हसू लागले. डोक्‍यातून स्वेटर खाली ओढत नाना गॅलरीत आले. “”आलो रे. फक्‍त पाच मिनिटं.” “”कानटोपी घालून जा. आज नेहमीपेक्षा थंडी जास्त वाटते.” “”हो गं. ही बघ घातली. निघू का आता?” हातात काठी घेऊन नानांची स्वारी मॉर्निंगवॉकला निघाली.

“”पाच मिनिटं म्हणता म्हणता किती वेळ ताटकळत उभं केलंस?” “”गोपाळा, होतो कधीतरी उशीर. तरी मी आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठलो होतो.” तेवढ्यात नानींनी गॅलरीतून आवाज दिला. “”अहो, तुम्ही कवळी इथंच विसरलात.” गोपाळ आणि दिनकरने एकमेकांकडे पाहिलं. “”वहिनी, टाका खाली. झेलतो मी.” इतक्‍यात नाना गडबडीने, “”ये अगं नको ऐकू याचं. तू निम्म्या जिन्यापर्यंत ये.” तोंडात कवळी बसवत नाना खाली आले. गोपाळ आणि दिनकर दोघे रागात नानाकडं पाहत होते. “”विसरतो माणूस कधी तरी.

आणि काय रे दिन्या, कॉलेजला असताना फायनलला तो एक झेल सोडलास आणि हातात आलेली मॅच हरलो आपण. हे विसरलो नाही मी. आणि तिला वरून कवळी टाकायला सांगतोस होय?” गोपाळने नानाला टाळी दिली आणि दोघे हसू लागले. “”हे बरं अजून तुझ्या लक्षात आहे.” “”हो मग. आणि तू त्या कुठल्या बरं एका मुलीला गुलाबाचं फूल दिलं होतंस… ते पण लक्षात आहे.तिचं नाव फक्‍त आठवेना. नाहीतर वहिनीला सांगितलंच असतं.” तेवढ्यात गोपाळ बोलला. “”रोहिणी. तिचं नाव रोहिणी होतं.” “”ये बाबांनो, बस करा आता. आणि गोप्या तुला रे तिचं नाव बरं लक्षात आहे.” “”दिन्या, मित्राच्या प्रत्येक सुखदुःखात हजर असावं लागतं. पहाटेच्या थंडीला गुलाबी का म्हणतात, ते आज मला कळलं! तुम्हा दोघांचे चेहरे काय खुललेत म्हणून सांगू!” “”माझं एक ठीक आहे;पण यात गोप्याचा चेहरा खुलण्याचं काय कारण?” “”एक फुल दो माली.” “”काय सांगतोस?” “”दिन्या, या नानाचं काय ऐकतोस. तुला माहीत आहेना याचा स्वभाव. नाना, आता बसकर याच्या जखमेवर मीठ चोळायचं!” नाना आणि गोपाळ पुन्हा हसू लागले.

“”तुम्ही दोघांनी आज माझी खेचायची ठरवलंय का?” नानाने दिनकरच्या खांद्यावर हात ठेवला. “”दिन्या, बोलता बोलता बरंच दूर आलो रे आपण.त्या समोरच्या बाकड्यावर बसू थोडा वेळ.” नानांनी एक सुस्कारा सोडला आणि पायजाम्याच्या खिशातला पंचा काढत कपाळावरचा घाम पुसून घेतला. “”दिन्या, चेष्टा केली रे तुझी.” “”हो नाना, कळलं मला. मी पण असंच म्हटलं. आणि आपल्याला जास्त जगायचं म्हणल्यावर हसायला नको का?” तिघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले.हसता हसता नाना मध्येच शांत झाले.

एक दीर्घ श्‍वास घेतला आणि काहीशा गंभीर आवाजात बोलू लागले. “वसंता, तुला नव्हतं का रे जास्त जगायचं? आमच्या सोबत हसायचं? एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाशील वाटलं नव्हतं.’ गोपाळने पिशवीतली पाण्याची बाटली काढली आणि नानांसमोर धरली. “”नाना, पाणी घे.” नानांनी पाणी पीत आवंढा गिळून घेतला आणि खाली मान घालून काही वेळ शांत बसून राहिले. गोपाळ आणि दिनकरसुद्धा क्षणात दुःखी झाले. असं म्हणतात, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण या चौघांकडे पाहून असं वाटतं की, मैत्रीच्या गाठीही स्वर्गातच बांधल्या जात असाव्यात! चौघेही बालपणापासूनचे मित्र.

शाळेतलं शिक्षण पूर्ण झाल्यावर गाव सोडलं आणि पुण्यात एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतलं.”चौघांना एकच रूम मिळणार असेल तर द्या, नाहीतर चाललो आम्ही.’ अशी तंबीच जणू त्या रेक्‍टरला दिली होती. चौघांच्याही मनमिळावू स्वभावाने हॉस्टेलमधली मुलं त्यांना लडून पडायची. सबमिशन पूर्ण करायचं म्हणून जागून काढलेल्या रात्रीत, वसंताच्या काव्यमैफिलीने एक वेगळीच रंगत यायची! तर भल्या पहाटे थंडीने कुडकुडत गार पाण्याने अंघोळ करताना नानाच्या शास्त्रीय गायकीने दिवसाची सुरुवात मंगलमय व्हायची! दिनकर, खिडकीतून समोरच असलेल्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये रोहिणीची झलक पाहायला मिळेल म्हणून चातकासारखी वाट पाहत बसायचा! आणि गोपाळ मात्र काळजीवाहू सरकारसारखं सगळ्यांची काळजी घ्यायचा. कधी नाश्‍त्याला हॉटेलातून पोहे आणायचा; तर कधी कुणाला साधा ताप जरी आला तरी रात्ररात्र त्याच्या बाजूला बसून काढायचा!

पुढे चौघांचीही लग्न झाली. एक वसंता सोडला, तर प्रत्येकाच्या संसाराच्या वेलीवर फुलंही उमलली. वर्षामागून वर्षे सरत गेली.वसंताची ओंजळ मात्र रिकामीच राहिली. त्याच्या आत सलणारं दुःख तो लपवायचा आतोनात प्रयत्न करायचा. परंतु या तिघांच्या नजरेतून ते कधीच नाही सुटलं. सावलीसारखी त्याची सोबत केलेल्या कुमुदलाही काळाने त्याच्यापासून हिरावून घेतलं. तिच्या जाण्यानं जणू वसंताची जगण्याची शेवटची उमेदच संपली होती. त्या दिवशी वसंताची भेट झाली नाही म्हणून हे तिघे त्याच्या घरी गेले. वसंता अंधाऱ्या खोलीत अंथरुणावर पडून होता. “”वसंता, डोळे उघड. आम्ही आलोय.” वसंताच्या शरीरात त्राण उरला नव्हता.

नानाने वसंताचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. सगळं बळ एकवटून तो बोलू लागला. “”नाना, थोडेफार पैसे मागे टाकले होते. त्या पेटीत आहेत. एक शेवटची इच्छा आहे. एखाद्या अनाथाश्रमाला देऊन टाका.” “”हो वसंता. पण असं शेवटचं म्हणून नकोस रे बोलू. हे बघ आम्ही तुला आता दवाखान्यात घेऊन जातोय. आणि मग तू बरा झालास की तुझ्या हातानेच देऊ.” वसंताची सैल झालेली हाताची पकड नानाने पुन्हा घट्ट धरायचा प्रयत्न केला; पण मुठीत घट्ट धरलेली रेती जशी सर्रकन निसटावी तसा वसंताचा हात नानाच्या हातातून निसटला; तो कायमचाच!

दहा वर्षे झाली वसंताला जाऊन.दरवर्षी त्याच्या वाढदिवशी हे तिघे अनाथाश्रमात जातात आणि कणभर का होईना पण सुख त्या निष्पाप पोरांच्या झोळीत टाकतात. तिघंही वसंताच्या आठवणीत हरवून गेले होते. आठवणींच्या गुंत्यातील एक गाठ सुटली आणि बाकी गाठी कशा भराभर मोकळ्या होत गेल्या. काही वेळाने गोपाळ, “”नाना, आज वसंताचा साठावा वाढदिवस. ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झालीय.” नाना भानावर येत, “”हो. संध्याकाळी जाऊ आपण.” तेवढ्यात गोपाळने समोरच्या चहावाल्याला आवाज दिला.

“दोनमध्ये चार दे.’ आपला मित्र वसंता इथंच आपल्यासोबत असावा. कदाचित त्या मंद अंधारातल्या धुक्‍यापलीकडं..!तिघांनी एकमेकांच्या खांद्यावर आपले सुरकुतलेले हात ठेवले. “”नाना, तुझ्या आवाजात आज काहीतरी पेश कर ना.” डोळ्यातले आसू लपवत आणि ओठांवर काहीसं हसू आणत नाना थरथरत्या आवाजात गुणगुणू लागले. “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी…’

आठवण
अमोल भालेराव

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.